पुणे : पुणे शहरात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या बंटी-बबलीच्या जोडीला विश्रामबाग पोलिसांनी शनिवारवाडा परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
विकी दादा गायकवाड (वय-२६) आणि एक तरुणी (वय-२२ दोघे रा. सांगवी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेल्या एकाची पार्किंगमधून दुचाकी चोरी झाली होती. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलीस अंमलदार खरात व पाटील यांना एक जोडपे संशयीतरित्या दुचाकी गडीची पाहणी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी शनिवारवाडा परिसरातून पाच दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच चोरलेल्या दुचाकी त्यांच्या मुळ गावी लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या चार मोटार सायकल आणि एक मोपेड जप्त केली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने ,पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, मनोज बरुरे पोलीस अंमलदार अशोक माने, हेमंत पालांडे, हर्षल दुडुम, मयुर भोसले, प्रकाश बोरुटे, सागर गोंजारी, आशिष खरात, राहुल मोरे, अर्जुन थोरात आणि साताप्पा पाटील यांच्या पथकाने केली आहे.