उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०२) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या आवारात विद्यालयीन टोळक्याने नंग्या तलवारी घेऊन अक्षरशः हौदौस घातल्याचा अतिशय गंभीर प्रकार घडला होता. याबाबत उरुळी कांचन ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उरुळी कांचन येथील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंकित उरुळी कांचन पोलीस चौकी दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना ग्रामस्थांतर्फे एक निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, तलवारी, हॉकी स्टिक हातात घेऊनच आवारात सुमारे तासभर गोंधळ, दहशत, शिविगाळ व धुडघुस घालण्याचा प्रकार सरु होता. महाविद्यालयाच्या आवारात नंग्या तलवारी दाखवून दहशतीचा नंगानाच घातल्याने उरुळी कांचन शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे उरुळी कांचनसह परिसरातील महिला, विद्यार्थी, लहान मुले व मुली, नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासातून उरुळी कांचन येथील नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहे.
उरुळी कांचनमध्ये महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयात दौंड, पुरंदर व हवेली या तीन तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांची टपोरेगिरी, दादागिरी असे सर्रास प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. अगदी बाहेरील विद्यार्थी शहरात प्रवेश केल्यानंतर दुचाकी वाहनांवरुन घिरट्या घालणे, टोळी टोळीने वावरणे, महाविद्यालयीन आवारात धुडघुस घालने हे नित्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारातून विद्यार्थ्यांनीची छेड काढणे, मारामारी करणे असे सर्रास प्रकार घडत आहेत.
दरम्यान, अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाळा भरण्याच्या वेळेत व शाळा सुटण्याच्या वेळेत पोलीस कर्मचारी कार्यरत करावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, “लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार घडल्यास यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या मुलांना बाहेरील मुले अथवा वर्गातील मुलांना त्रास देतात त्यांनी शिक्षक, प्राचार्य किंवा पोलिसांना माहिती द्यावी. पोलीसही शाळेतील प्राचार्य व शिक्षकांच्या संपर्कात राहतील. त्यामुळे प्रत्येक सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. जर असे गुन्हे मुलांवर दाखल झाले तर त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे अशा गोष्टी मुलांनी टाळाव्यात असे आवाहन केले आहे.”