पुणे : पुण्यातील कोंढवा भागातील शिवनेरी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून पीडित महिलेच्या घरात घुसून गॅस सिलिंडरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर तिने आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावलेल्या सासूवर देखील गॅस सिलिंडरने हल्ला केला आहे. ही घटना ७ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भीमाशंकर (पूर्ण नाव पत्ता नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही तिचे पती, सासू आणि दोन मुलांसह राहतात. ही महिला गोळीबार मैदान येथे एका लष्करी रुग्णालयात कक्ष (वॉर्ड) सहाय्यक म्हणून काम करते. याच ठिकाणी भीमाशंकर नावाचा मुलगा हा स्वच्छता कर्मचारी म्हणून कामास आहे. त्याची आणि या महिलेची जवळपास तीन वर्षांपासूनची ओळख आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून या महिलेला ‘‘तू मला खूप आवडतेस,’’ असं म्हणाला होता. त्यावेळी महिलेने ‘‘माझे लग्न झाले असून मला दोन मुले आहेत. पुन्हा असा त्रास द्यायचा नाही,’’ अशी समज दिली होती. याबाबत त्यांनी पतीलादेखील माहिती दिली होती.
दरम्यान, गुरुवारी फिर्यादी आणि त्यांचा लहान मुलगा घरामध्ये दोघेच होते. त्यावेळी आरोपी घरी आला. घाबरलेल्या महिलेने त्याला तू घरी कसा आलास? येथून निघून जा. नाहीतर मी पती आणि सासूला बोलावेन, अस सांगूनही त्याने पीडितेला ढकलून देत घरात घुसला. यावेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला. यावेळी तिचा आवाज ऐकून जाऊ आणि सासू तेथे आल्या. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीच्या जावेने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली.
आतून आरोपीने आरडाओरडा करीत घरातील गॅस सिलिंडर हातात घेतला. हा सिलिंडर दारावर मारून दार तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या आरोपीने फिर्यादीच्या सासूच्या डोक्यात गॅस सिलिंडर मारत त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच फिर्यादी महिलेच्या पाठीत सिलेंडर मारून तिला मारहाण केली. सिलिंडरच्या सहाय्याने घराचा लाकडी दरवाजा तोडून आरोपी पसार झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल दाखल केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.