सोलापूर : मोडलिंबकडून पंढरपूरकडे जात असताना फॉर्च्युनर कार ५० फूट कालव्यात कोसळली. या अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख या जागीच मृत्युमुखी पडल्या असून त्यांची कन्या, नात व गाडीचालक गंबीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोचले व दोराच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून पंढरपूरला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
रविवारी रात्री लावणी कलावंत मीना देशमुख व त्यांचे कुटुंबीय फॉर्च्युनर गाडीने प्रवास करत होते. यावेळी मोडलिंब-पंढरपूर रस्त्यावरील अरुंद पुलावरून जाताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कालव्यात कोसळली.
अपघातात मीना देशमुख या जागीच मृत्युमुखी पडल्या असून बाकी तीन जखमींवर उपचार सुरु आहेत. अंबिका देशमुख (वय ३), जान्हवी देशमुख (वय १०) व अण्णा देशमुख (वय ३५) असे या अपघातात जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याचे लक्षात येताच पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिका बोलाविली. मात्र कालव्याची खोली जास्त असल्याने कर्मचाऱ्यांना कालव्यात उतरता येत नव्हते. दोरीच्या साहाय्याने कालव्यात उतरताना जखमी व मृतांना दोरीच्या साहाय्याने वर काढण्यात आले व जखमींना पंढरपूरला हलविण्यात आले.
सध्या, पंढरपूर कुर्डुवाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या पुलाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालल्याचा आक्षेप स्थानिकांकडून घेतला जात आहे.