वसई : वसईत नैराश्यातून वीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या अफेअर नंतर तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस, असे सांगून लग्नाला नकार दिल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा या तरुणासोबत मागील 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. मात्र नंतर तिला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला. त्यानंतर त्याच्या वडिलांने तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही, असे तरुणीला सांगितले. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणीने राहत्या घरी उंदीर मारायचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान याप्रकरणी आरोपी मुलाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.








