Uruli kanchan News उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथील एक बंगला फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह तब्बल ८ लाखाच्या दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.११) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Uruli kanchan News)
चंद्रकांत मारुती आढाव (रा.सोरतापवाडी, ता.हवेली) असे चोरी झालेल्या बंगल्याच्या मालकाचे नाव आहे.
सोरतापवाडी फाट्याजवळील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आढाव यांचा पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ बंगला आहे. सोमवारी (ता.१०) मध्यरात्री तीन चोरट्यांनी कटरने खिडकीचे गज कापून आढाव यांच्या बंगल्यात प्रवेश केला.
दरम्यान, चोरट्यांनी कपाटातील ३ लाख रोकड व १० तोळे सोने असे तब्बल ८ लाखाच्या ऐवज चोरला होता. त्यानंतर चोरटे घरामध्ये अजून चोरी करण्यासाठी शोधाशोध घेत असता, घरातील मंडळी जागी झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मार्ग काढण्याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.