उरुळी कांचन (पुणे) : ‘एक शिक्षकी’ प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या ‘बहुशिक्षकी’ शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरुन निराश झालेल्या ‘एक शिक्षकी’ प्राथमिक शाळेतील ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहुन ठेवल्याने या धक्कादायक प्रकरणाची उकल होण्यास मदत झाली.
अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ – मावडी पिंपरी ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते. अरविंद देवकर यांनी मागील गुरुवारी (ता.३) शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर पाच दिवसांनी (दि.8) हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद देवकर यांची जून महिन्यात दौंड तालुक्यातील मिरवडीच्या शाळेतून जावजीबुवाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या एकशिक्षकी शाळेत बदली झाली होती. होलेवस्तीच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असले तरी या शाळेत अवघे दहाच विद्यार्थी शिक्षण घेत होते. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा सुरु होताना शाळेची दुरावस्था पाहून अरविंद देवकर यांनी शाळेत शिक्षण घेणाऱ्या दहाही मुलांच्या मदतीने शाळा व परिसराची साफसाफाई करून घेतली होती.
पालकांचा शाळेत गोंधळ, शाळेत पाठवणे बंद
दरम्यान, ही बाब विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपापल्या पालकांना सांगितली. यावर मुलांकडून शाळा व परिसराची स्वच्छता करुन घेतल्याच्या कारणावरुन चिडलेल्या दहाही मुलांच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन गोंधळ घातला. या गोंधळानंतर पुढील पाच ते सहा दिवसांच्या आतच शाळेतील दहापैकी नऊ मुलांच्या पालकांनी आपापल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या जावजीबुवाचीवाडी गावच्या हद्दीतील दुसऱ्या शाळेत हलविले. दहापैकी नऊ विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने होलेवस्तीच्या शाळेत एकच विद्यार्थी उरला होता. त्यानेही दुसऱ्या दिवसापासून शाळेकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली.
सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने शिक्षक तणावात
दहाच्या दहा मुले शाळा सोडुन गेल्याने अरविंद देवकर मोठ्या प्रमाणात खचले. त्यातूनच त्यांनी मंगळवारी दुपारी शाळेतच तणनाशक औषधाचे सेवन केले. शरीरात तणनाशकाचे प्रमाण जास्त झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. ही बाब शाळेशेजारील नागरिकांना समजताच तेथील नागरिकांनी अरविंद देवकर यांना उपचारासाठी सुरुवातीला उरुळी कांचन येथील श्री गणराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले. अरविंद देवकर यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात तणनाशक गेल्याने त्यांचे शरीर उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. हे पाहून डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. एका आदर्श शिक्षकाने अशाप्रकारे स्वत:च जीवन संपवल्याने उरुळी कांचनसह शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अरविंद देवकर यांचा अल्प परिचय –
अरविंद देवकर हे मागील 19 वर्षांपासून उपशिक्षक म्हणून दौंड तालुक्यात कार्यरत होते. खुपटेवस्ती येथील प्राथमिक शाळेत 12 वर्षे तर मिरवडी येथील शाळेत 6 वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपशिक्षक म्हणून काम केले. दोन महिन्यांपूर्वी मिरवडीहून होलेवस्ती येथील शाळेत बदलून आले होते. साधी राहणी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. ते उत्कृष्ट शिक्षक म्हणूनही परिचित होते.
पत्नीही शिक्षिका तर वडील माजी सैनिक
अरविंद देवकर यांची पत्नी मनिषा याही शिक्षिका असून, त्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात कार्यरत आहेत. तर त्यांचे वडील ज्ञानेश्वर हे माजी सैनिक आहेत. अरविंद यांचा भाऊ विजय हेही कोलवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तर विजय यांची पत्नी उषा या शिंदवणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अशा उच्चशिक्षित कुटुंबांतील सदस्याने आत्महत्या केल्याने उरुळी कांचन व अरविंद देवकर यांच्या मूळगावी, मावडी पिंपरी (ता. पुरंदर) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खाजगी सावकाराचा जाचही कारणीभूत
अरविंद देवकर यांनी स्वतःच्या शाळेतील विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने आत्महत्या केल्याबाबत चिठ्ठी लिहून ठेवलेली असली तरी अरविंद देवकर यांच्या नातेवाईकांनी मात्र अरविंद देवकर यांच्या आत्महत्येच्या मागे शाळेतील विद्यार्थी शाळा सोडून गेल्याचे एकमेव कारण नसल्याचा दावा केला आहे. उरुळी कांचन व परिसरातील काही खाजगी सावकार व त्यांचे ‘बगलबच्चे’ त्रास देत असल्याने अरविंद देवकर यांनी आत्महत्या केल्याचा दावा देवकर यांच्या नातेवाईकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना केला. पुढील दोन दिवसात पोलिसांना भेटून त्याबाबतच्या पुराव्यासह तक्रार दाखल करणार असल्याचे अरविंद देवकर यांच्या नातेवाईकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठवणार
अरविंद देवकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस. डी. महाजन म्हणाले, ‘अरविंद देवकर यांच्यासारख्या आमच्या एका शिक्षक सहकाऱ्याने आत्महत्या करणे ही बाब अतिशय दुर्दैवी व मनाला चटका लावणारी आहे. अरविंद देवकर यांची आत्महत्या व त्यासंदर्भातील कारणे याबाबतची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अरविंद देवकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील कारणाबाबतची माहितीही मिळवली जात आहे. ही माहिती मिळताच अहवाल तयार करुन वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जाणार आहे’.