Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनसह परीसरातील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या चालकाला मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या अगोदरही तुळजापूर परिसरात अशा घटना घडल्या असून याबाबत भाविकांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुभाष दिनकर कांबळे (वय – ५५, व्यवसाय चालक (रा. उरळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोन्या पांडुरंग पवार (रा. मलबा हॉस्पीटल जवळ, तुळजापुर, ता. तुळजापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
कांबळे हे चारचाकी चालक असून त्यांचा चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी उरुळी कांचन येथील भाडे घेऊन ते स्वतः तुळजापूर या ठिकाणी गेले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गाडीतील भाडेकरू हे तुळजापूर येथील देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी चालक कांबळे हे गाडी बंद करून गाडीच्या वरती झोपले होते.
यावेळी त्या ठिकाणी सोन्या पवार नावाचा एक व्यक्ती आला व त्याने कांबळे यांना गाडीवर का झोपलास म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी कांबळे यांनी त्याला तुला काय करायचे जा असे म्हणाला असता त्याने तेथे पडलेला एक दगड उचलुन कांबळे यांना जोरदार मारला व त्या ठिकाणावरून पळुन गेला.
दरम्यान, सदरचा दगड हा कांबळे यांच्या उजवे डोळ्याचे वरच्या बाजुस लागल्याने तेथे जखम होवुन रक्त निघाले, यावेळेस त्यांच्याबरोबर असलेले अमृत पोपट सुपे यांनी मला उपचार कामी सरकारी दवाखाना तुळजापुर येथे पाठविले व उपचार करून तुळजापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. तसेच सोन्या पवार याने दगड मारल्याची माहिती सदरील काही चालकांनी दिली असून त्यांच्या सांगण्यावरून त्याच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत बोलताना सुभाष कांबळे म्हणाले, “महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी तुळजापूर या ठिकाणी अशा घटना होत असतील तर हि लाजिरवाणी गोष्ट आहे. सदर सोन्या पांडुरंग पवार या व्यक्तीने आजतागायत अशा खूप चालकांना व बाहेर झोपलेल्या भाविकांना त्रास दिला आहे. त्यामध्ये बोटे मोड, मारहाण, तसेच डोके भोडून शिविगाळ केली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला तुळजापूर पोलीस पाठीमागे घालीत आहेत. अशा वारंवार घटना होत असतील तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!