नारायणगाव : वडगाव कांदळी ग्रामपंचायत हद्दीतील वडामाथा (ता. जुन्नर) येथे सापडलेल्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. एकाच वेळी दोन पुरुषांबरोबर प्रेमसंबंध ठेवून दोघांना ब्लॅकमेल करीत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सुनितादेवी शिवकुमार यादव (वय ३०, सध्या रा. माताजीनगर एमआयडीसी नागापूर अहमदनगर, मूळ रा. मिरजावा, ता. तिरवेणीगंज, जि. सुपौल, राज्य बिहार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शुभम मनोज गुळसकर (वय २२, रा. बोल्हेगाव अहमदनगर) आणि मिथीलेश डोमी यादव (रा. एमआयडीसी वडगाव कांदळी, ता. जुन्नर, मुळ रा. मिरजावा, ता. तिरवेणीगंज, जि. सुपौल, राज्य बिहार) असे पोलिसांनी अटक केलेल्या प्रियकर आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव कांदळी (ता. जुन्नर जि. पुणे) येथे चवळीच्या शेतात शुक्रवारी (ता. १४) अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी जाऊन नारायणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंचनामा केला होता. यावेळी माव्याची पुडी व मृत महिलेच्या अंगावरील ओढणीला सुविधा मार्केट नाव असलेले बारकोड स्टीकर आढळून आले होते. सदर खुनाचा पोलीस शोध घेत असताना कोणताही सबळ पुरावा आढळून आला नाही त्यामुळे खुनाचे गूढ उलगडणे हे पोलिसांसमोर मोठे ध्येय होते.
मागील एक वर्षांपासून शुभम गुळसकर व त्याच्या साथीदार मिथीलेश यादव या दोघांचे मृत महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर येथून संशयित आरोपी शुभम गुळसकर व त्याच्या साथीदार मिथीलेश यादव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना महिती दिली कि महिला गेल्या काही दिवसांपासून या दोघांनाही वारंवार पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करत होती. महिलेच्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमत करून या महिलेचा काटा काढण्याचा कट रचला.
दरम्यान, शुभम याने सुनितादेवीला अहमदनगर येथून कांदळी (ता. जुन्नर) गुरुवारी (ता. १२) जानेवारी रोजी सांयकाळी घेऊन आला. शुभम व मिथिलेश या दोघांनी मिळून तिच्याच गळ्यातील ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदिप वारे, पोपट मोहरे, दिनेश साबळे, सचिन कोबल यांच्या पथकाने केली.