लोणी काळभोर (पुणे) : “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७९९ रुपयात दोन तास अनलिमिटेड दारु” अशी जाहीरात करुन कोणी दारु विक्री करत असल्याचे तुम्ही आत्तापर्यंत पाहिले नसेल ना, नसणारच… कारण महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असल्याने अशी हिमंत आत्तापर्यतं तरी कोणी केल्याचे ऐकवत नाही. लोणी काळभोर येथील एका हॉटेल चालकांने मात्र लोणी काळभोर हद्दीतील एका नामांकित खाजगी विद्यापिठाच्या दारातच “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७९९ रुपयात दोन तास अनलिमिटेड दारु” अशी जाहीरात करुन खुली दारुविक्री विक्री सुरु केल्याचे उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील जेष्ठ कायदेतज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी वरील घटनेबाबतची पोस्ट फेसबुकच्या माध्यमातुन प्रसारीत केल्यानंतर, लोणी काळभोर हद्दीतील एका नामांकित खाजगी विद्यापिठाच्या दारातच वरील संतापजणक प्रकार नागरीकांच्या लक्षात आला. त्याच दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनीही तात्काळ हालचाली करुन कदमवाकवस्ती हद्दीतील द टीप्सी टेल्स हॉटेल” या हॉटेलच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. देवीप्रसाद सुभाष शेट्टी (वय-३३ रा. बी-१००१, जयमाला बिजनेस कोर्ट, शेवाळवाडी, ता. हवेली) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रदीप भिमराव क्षीरसागर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीस्टेशन परीसरात द टीप्सी टेल्स नावाचे हॉटेल असुन, हे हॉटेल देवीप्रसाद सुभाष शेट्टी याने चालवण्यास घेतलेले आहे. मागिल कांही दिवसापासुन शेट्टी याने आपल्या हॉटलचा दारुचा व्यवसाय वाढावा य़ासाठी, लोणी काळभोर येथील एका बड्या खाजगी विध्यापिठाच्या प्रवेशद्वारासमोरच “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ७९९ रुपयात दोन तास अनलिमिटेड दारु” अशी जाहीरात करुन खुली दारु विक्री सुरु केली होती.
शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापिठाच्या प्रवेशद्वारापासुन किमान शंभर मिटर अंतरावर दारु विक्री करण्यास काद्याने बंदी असतांनाही, शेट्टी मात्र राजरोसपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दारुची विक्री करत होता. स्थानिकांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेट्टी याने स्थानिक गुंडांना हाताशी धरुन वरील घटनेबाबत आवाज उठवणाऱ्या नागरीकांचा आवाज बंद केला होता.
दरम्यान पुण्यातील जेष्ठ कायदेतज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी गुरुवारी सायंकाळी वरील घटनेबाबतची पोस्ट फेसबुकच्या माध्यमातुन प्रसारीत केल्यानंतर, पुण्यासह लोणी काळभोर परीसरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्यानंतर लोणी काळभोर ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेलवर जाऊ, हॉटेल चालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहेत.