पंढरपूर : कास पठार पाहण्यासाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावाजवळ कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लासुर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन फिरण्याच्या निमित्ताने कारमधून साताराकडे निघाले होते. सर्व कामगार कास पठार पाहण्यासाठी जात असताना पहाटेच हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले.
चौघांचा मृत्यू तर तिघे गंभीर..
या भीषण अपघातामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेश शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कामगार असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.