रांजणगाव : शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून याची ओळख रांजणगाव (ता. शिरुर) येथील फियाट कंपनीत मैलामिश्रित पाण्यात बुडून दोन कामगारांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ०४) सकाळी घडली आहे.
मच्छिंद्र काळे आणि सुभाष उघडे असे मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नावे आहेत. या घटनेने औद्योगिक वसाहतीत शोककळा पसरली असून घटनास्थळी रांजणगाव पोलीस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र काळे आणि सुभाष उघडे हे रांजणगाव परिसरात राहणारे रहिवासी होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फियाट नावाची कंपनी आहे. या कंपनीत सकाळच्या सुमारास कंपनीचे कामगार मेलामिश्रित पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघेजण टाकीत उतरले होते. टाकी साफ करत असताना एकजण तोल जाऊन टाकीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनी उडी मारली. मात्र, त्या तिघांपैकी एक जण सुखरूप वर आला. त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
दोघांना टाकीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराअगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले आहे. तिसऱ्या कामगाराचे नाव समजू शकले नाही. रांजणगाव येथे मोठी औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. त्यामुळे लाखोच्या संख्येने कामगार काम करत असतात. मैलामिश्रित पाण्याची टाकी साफ करत असताना हा प्रकार घडला आहे. रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.