पुणे : खंडाळा तालुक्यातील विंग येथील अजय इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये कंपनी तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याचा मशीनमध्ये डोके अडकल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जितेंद्र चौधरी (वय ५१, रा. पालघर) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र चौधरी हे इलेक्ट्रिशन असून, सध्या ते प्लॅटिनम इंडस्ट्रीज पालघर या ठिकाणी काम करत होते. विंग येथील अजय इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीमध्ये जितेंद्र चौधरी हे मोल्डिंग मशीनच्या तपासणीसाठी आले होते. या तपासणीदरम्यान मोल्डिंग मशीनचे गार्ड अचानक उघडले गेले व या मशीनच्या एअर प्रेशरमुळे चौधरी यांचे डोके मशीनमध्ये अडकले.
दरम्यान, ऑपरेटरने प्रसंगावधान राखून मशीन बंद करण्यात आली. मात्र, तोपर्यंत चौधरी याचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे कंपनीमधील असुरक्षितता पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे. कंपन्या कामगारांच्या जीवाशी अशा खेळत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.