बुलढाणा : राज्यात अपघात थांबायचे नाव घेत नाही आहे. आता अशातच बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं आहे. या अपघाताबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमका हा अपघात आहे की घातपात?. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या कुंड बुद्रुक येथे ही अपघाताची घटना घडलीय. या परिसरात राहणारे पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (वय 58 वर्ष) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला.
त्यानंतर हॉटेल यादगार नजीक वाहन पकडण्यासाठी ते पायी जात असताना, त्यावेळी मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव (gj -15 bf -2564) चारचाकी वाहनाने कवळे यांना वेगाने धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ते हवेत अक्षरशः भिरकावल्या जाऊन दूर अंतरावर जाऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.