पुणे : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामिण) शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
संदीप मुरलीधर कौधर (वय -४० रा.दादा शिंदे यांचे भाडेचे खोलीत, चेलाडी फाटा ता.भोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अभिनव गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
सदर घटनेचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार अजय घुले यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करून फरार असलेला आरोपी हा कापूरहोळ येथील अमृता हॉटेल येथे आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंघाणे सदर ठिकाणी जावून सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे वरीलप्रमाणे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करून तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले यांनी केली आहे.