पुणे : पुणे स्टेशन परिसरातून अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून १६ लाख ३२ हजार रुपयांचे एक किलो ८८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, दुचाकी असा १८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिर मसिउल्ला खान (वय २४, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तरप्रदेश), अतुल गौरव वानखडे (वय २२, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. तथागतनगर, खामगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, खान आणि वानखडे पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता परिसरात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चरस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदीप जाधव आदींनी केली आहे.