पुणे : कोंढवा येथे कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील व्यक्तीसह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट १ने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम ९२० मिलीग्रॅम कोकेन, मोबाईल असा एकूण ७ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेका हमीस फाऊनी (वय ४६, सध्या रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. टांझानिया), अरशद अहमद इक्बाल खान (वय.४२, रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फाऊनी आणि खान कोंढवा परिसरातील धर्माशी सिग्नेचर सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रोडवर कोकेन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई नितेश जाधव यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या.
त्यांच्याकडून कोकेन, मोबाइल असा ७ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेका फाऊनी याला यापूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात पकडले होते. नुकताच तो जामीन मिळवून येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.