राहुलकुमार अवचट
यवत (पुणे) : देलवडी गावात रहिवासी असलेल्या मुलाला खोट्या लग्नाचा बनाव करून २ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी देलवडी येथे रहिवासी असलेल्या मुलाने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथे देलवडी येथे रहिवासी असलेल्या मुलाला (एमएच ४६ एक्स ६६४४) या चारचाकी वाहनाचा वापर करून २५ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे लग्नासाठी २ लाख रुपये घेऊन चित्रा अंभोरे तिच्याशी लग्न लावून दिले. परंतु चित्रा अंभोरे हिने नांदण्यास नकार देऊन शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी फसवणूक झाली असून, देलवडी येथे रहिवासी असलेल्या मुलाने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बाबू चव्हाण (रा.यवत ता.दौंड जि.पुणे), सिंधु माळी (रा.कोरेगांवभिमा ता.शिक्रापुर), सांडु यशवंता जाधव (रा.मढ ता.जि.बुलढाणा), सतिश मधुकर जोशी (रा.अशोकनगर सातपुते, नाशिक), चित्रा कैलास अंभोरे (रा.मनमाड रामलालनगर ता.नांदगांव जि.नाशिक), आशा नानासाहेब निकम (रा.जेलरोड नाशिक), ज्योती रविंद्र लोखंडे (रा.चाचडगांव ता.दिंडोरी जि.नाशिक), मेघा गोपाल सोळंखी (रा.पंचवटी नाशिक), आकाश दिनेश कोटे (रा.देवळालीगांव फुलेनगर, नाशिक) या आठ जणांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.