पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी कंपनीतील कामगारांना तब्बल अडीच कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील ताडीवाला रोड येथील न्यू एडियु व्हिजन कन्सलटन्सी येथे उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम ऊर्फ सॅम जोशी (रा. ऑस्ट्रेलिया) आणि दिपिका कामदार (रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड येथील हेरीटेज अपार्टमेंटमध्ये न्यु एडियु व्हिजन कन्सलटन्सी ही कंपनी आहे. दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीतील इच्छुक कामगारांची भेट घेतली. ऑस्ट्रेलिया स्किल व्हिसा प्रा. लि. या कंपनीमार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देणार असल्याचे सांगून आरोपींनी कामगारांना विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना ऑस्ट्रेलिया येथील नामांकित हॉटेलचे ऑफर लेटर दिले. ऑफर लेटर पाहून फिर्यादी व त्यांच्या कंपनीतील इतर अर्जदारांनी व्हिसा व अन्य कामासाठी त्यांना २ कोटी ३८ लाख १८ हजार रुपये पाठविले.
दरम्यान, आरोपींनी दिलेले ऑफर लेटर हे बनावट असल्याचे फिर्यादी यांना समजतात त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम ऊर्फ सॅम जोशी आणि दिपिका कामदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.