लहू चव्हाण
पाचगणी : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पाचगणी पोलिसांची धडक कारवाई केली आहे. सलग दोन दिवसाच्या धाडसत्रात पोलिसांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ; दोन धंदे चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांच्या छापेमारीमुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
साहेबराव शंकर कदम (वय- ३५) व अशोक दिनकर कासुर्डे (वय ५१ रा. पाचगणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसात पाचगणी पोलिसांनी दारू व्यवसायिकांच्या विरोधात मोहीम तीव्र केली असून यामध्ये भीमनगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या अडोषाला आरोपी साहेबराव शंकर कदम (वय वर्षे ३५) दारूच्या बाटल्या शनिवारी (ता. २८) संध्याकाळी पावणेसात च्या सुमारास विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांना त्याच्याजवळून १८० मिलीच्या २० बाटल्या किंमत ९८० रुपये माल हस्तगत केला.
दुसऱ्या घटनेत बाटलीवाला बंगल्या शेजारी फेमस फेब्रिकेशन लगतच्या पान टपरीच्या आडोशाला आरोपी अशोक कासुर्डे हा रविवारी (ता. २९) बाटल्या विकत असताना आढळून आला. आरोपीकडून प्लास्टिक पिशवीत भरलेले २० फुगे, प्रत्येक फुग्यात एक लिटर ताडी, त्याची किंमत ५० रुपये तर दुसऱ्या पोलिथिन बॅगमध्ये १४ फुगे, असा १७००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, आरोपी साहेबराव कदम व अशोक कासुर्डे या दोघांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचगणी पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाय एस महामुलकर, हवालदार एस.जी. शेळके, पोलीस नाईक आणि यु.आर.लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.