पुणे : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिशा सालियन हिच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियन यांचा व्हाट्सअप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली असून त्यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.आपलं व्हॉट्सअॅप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती. त्या महिलेला 3 हजार रुपये दिल्याचा दिशानं जाब विचारला होता. त्यानंतर त्या दोघांच्यामध्ये वाद झाला. वडिलांचे घर सोडून दिशा मालाड मालवणीस गेल्याच दिशाच्या मित्रांनी सांगितलं होतं. तिच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही याला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन आत्महत्या प्रकरणातील तपासादरम्यान पहिल्या एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आता दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हाट्सअप डाटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.याआधीच्या एसआयटी चौकशी दरम्यानही हा डाटा मिळाला होता. वडील सतीश सालियन एका महिलेशी बोलत असल्याचा संशय दिशाला आला होता. या संशयानंतर तिने वडिलांच्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस त्याच्या नकळत घेतला होता, जेणेकरून तिचे वडील कोणाशी बोलतात आणि काय करतात हे तिला कळू शकेल. वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवल्याचे लक्षात आल्यानंतर तिने जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. याप्रकरणी तिने आपल्या मित्र -मैत्रिणींना माहिती दिली होती.दरम्यान दिशा घर सोडून मालाड मालवणी येथे गेली. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी तिच्या मित्रांची चौकशी केली, त्यादरम्यान मित्रांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती.
दरम्यान पोलिसांनी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा दिशाने हे का केलं असावं, हे जाणून घेण्यासाठी जबाब नोंदवला, ज्यात त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा आणि त्यांच्या मित्राचा लोणचे बनवण्याचा व्यवसाय होता, त्याच दरम्यान त्याच्या मित्राचा मृत्यू झाला.
मित्राच्या पत्नीला आर्थिक अडचण होती.त्याचे आणि त्याच्या मित्राच्या पत्नीमध्ये काही नव्हतं, फक्त मानवतेच्या नात्याने ते तिला मदत करत होते, असा दावा त्यांनी केला आहे.
दिशा सालियन प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आमदार आदित्य ठाकरे,अभिनेता दिनो मोरया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.