Tulaja Bhavani News तुळजापूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरातून सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप करताना पुन्हा एकदा मंदिरातील दुर्मीळ मौल्यवान दागिन्यांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. तुळजाभवानी मातेचे मौल्यवान आणि शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. (Tulaja Bhavani News)
शिवकालीन अलंकाराच्या मोजणीचा अहवाल सादर करण्याची १२ जुलै डेडलाइन होती. पंचकमीटीने अहवाल १८ जुलै रोजी सादर केला असून या अहवालात अनेक गंभीरबाबी समोर आल्या आहेत.
भाविकांनी तुळजाभवानीला वाहिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण झाली. यावेळी देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचूचे ८ ते १० मौल्यवान अलंकार गायब झाले आहेत. त्या दागिने मोजणीचा अहवाल जिल्हाधिका-यांना सादर झाला. तेव्हा हि बाब समोर आली आहे.
दरम्यान, देवीच्या दागिन्यांच्या दुस-या क्रमांकाच्या डब्यात हे दागिने होते. ते नेमके कधी गायब झाले, याचा अंदाज बांधता येत नाही, असं पंच समितीनं आपल्या अहवालात म्हटलंय. हा अहवाल अद्याप जिल्ह्याधिका-यांनी स्वीकारलेला नाही. पुन्हा पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्याचे समजते आहे.