शिरुर : पुणे -सातारा महामार्गावर ट्रक व कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना पारगाव खंडाळा (जि. सातारा) येथे बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे अशी मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. तर संकेत भिमाजी चौधरी (वय २२), अनिल मुक्ताराम कुलथे (वय ५५), अंजली अनिल कुलथे (वय ५०), आराध्या अनिल कुलथे (वय ७), स्नेहल पांडुरंग कुलथे (वय ४२, सर्व रा. वडगाव रासाई ता. शिरूर) अशी जखमी झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील रस्त्यालगतच्या चहाच्या टपरीवरचा चहा पिण्यासाठी अनेक वाहने थांबलेली होती. तर वनशिवे व कुलथे कुटुंबही त्याच मार्गाने कारमधून चालले होते.
दरम्यान, कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने, चहा पिण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला थांबलेल्या ट्रकला कारणे पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खंडाळ्यातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.