जनार्दन दांडगे
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर एस टी बस, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे मंगळवारी (ता.१०) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली आहे.
सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले आहे.मात्र या अपघातात रस्तादुभाजकावर रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात आले आहे.
पी.डी सावंत असे ४० प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या एस टी बसचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट ते ठाणे या मार्गावर ठाणे आगाराची बस (क्र. एमएच १४ बीटी २६९३) ही दैनंदिन प्रवासी फेऱ्या मारते. नेहमीप्रमाणे आज ही एस टी बस अक्कलकोट हून ३० ते ४० प्रवास्यांना घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून चालली होती.
पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना, एस टी बस थेऊर फाट्याजवळ मंगळवारी (ता.१०) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आली असता, बसचा अचानक ब्रेक फेल झाला. आणि बसने पुढील कार आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कार आणि ट्रकचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातात रस्त्याच्या दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हातावरून व पायावरून गाडी गेल्याची माहिती मिळत आहे. त्याला उपचारासाठी तातडीने लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव व पत्ता अद्याप समजलेला नाही.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी व वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दैव बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण….
एस टी बस चालक पी.डी सावंत यांच्या बसचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला होता. त्यामुळे पुढील कार आणि ट्रकला एस टी बसने जोरदार धडक दिली. मात्र सावंत यांनी प्रसंगवधान दाखवून पुन्हा बसवर नियंत्रण मिळवून बस रस्त्याच्या एका बाजूला घेऊन थांबविली. त्यांमुळे दैव बलवत्तर असल्याने बसमधील ४० प्रवास्यांचे प्राण वाचले. असे बसमधील एका प्रवास्याने म्हणून दाखविले आहे. तसेच सर्व प्रवास्यांनी बसचालकाचे कौतुक करून आभार मानले.