लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे पुरेसा स्टाफ असुनही, केवळ वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ते उरुळी कांचन दरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. लोणी काळभोर पोलीस प्रशासनाचा वाहतूक विभाग यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वाहतूक विभागातील काही ठरावीक पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडीच्या वेळी, वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत असल्याने, उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकाच्या दोन्ही बाजुला वहातुक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरीष्ठ अधिकारी जागे होणार का? असा प्रश्न उरुळी कांचन, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी भागातील नागरीक विचारू लागले आहेत.
पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन दरम्यानच्या गावांतील राहणारा नागरिक घराबाहेर पडल्या नंतर तो सुखरूप परत येईपर्यंत कुटुबियांच्या जीवात जीव नसतो. पूर्व हवेलीतील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लोणी काळभोर पोलीस ठाणे ग्रामीणमध्ये होते. त्यावेळी वाहतूक शाखेचे अवघे २ पोलीस ४ वार्डनच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवत होते.
एक वर्षापुर्वी लोणी काळभोरचा शहर पोलीस ठाण्यात समावेश झाल्यानंतर स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. यामध्ये १ अधिकारी व २० कर्मचा-यांचा समावेश आहे. कर्मचारी संख्या वाढूनही समस्या कमी न होता वाढल्याने वाहतूक कोंडी जोमात तर वाहतूक शाखा कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जे काम ग्रामीणचे ६ जण सहजपणे करत होते. ते शहरच्या २१ जणांना का होत नाही ? हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यापासून उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत जेवढे चौक आहेत तेथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, व उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील चौकाचौकात वाहतूक कोंडी होते हे माहित असताना हि समस्या मार्गी लावण्याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस एवढे उदासीन का आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे महामार्गावरील चौक वाहतुक विस्कळीत होण्याचा नमुना ठरत आहे.
कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर, लोणी कॉर्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील तळवाडी चौक चक्क वाहनतळ झाले आहेत. येथून शाळा महाविद्यालयात, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे भाजीबाजारासह बाजारपेठही आहे. परंतु हे चौक वाहतूक नियमनात नापास झाल्याने मुख्य रस्त्यावर असलेली वाहनांची पार्किंग, बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशा कारणांनी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे.
कवडीपाट ते उरुळी कांचन या रस्त्यावर दुतर्फा झालेले अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना नाईलाजाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. उभ्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होणार नाही याची जबाबदारी वाहतूक शाखेचीच असताना हे कर्तव्य पोलीस विसरून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत का असेही नागरिक बोलू लागले आहेत.
महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. दुतर्फा उभ्या असलेल्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या अवजड वाहने, बेशिस्त चालक, वाहतूक पोलीसांची उदासीनता यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीसासाठी स्वतंत्र चौकी दिलेली असतानाही ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्याही उपाययोजनांचा अवलंब करत नसल्याने लहान मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. अशा वाहनांवर कधी कारवाई होणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोणी स्टेशन हद्दीत स्टेशन चौक ते कदमवस्ती या दरम्यान मोठ्या प्रमानात रस्त्यावरच वहाने उभी केली जात असतांनाही, वहातुक पोलिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहणांना अभय देत असल्याने, लोणी स्टेशन हद्दीत दिवसाआड अपघात होत आहेत. तर ऑईल कंपण्यांचे टॅंकर रस्त्यावर उभे राहत असल्याची समस्या, पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डोळ्याने दिसस असतांनाही, सर्वजण आंधळे असल्याचे दाखवत आहेत. लोणीस्टेशन चौकात ड्युडीवर असणारे पोलिस कर्मचारी एका कोपऱ्यात उभे राहुन, मोबाईलवर दंग असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. चार महिण्यापुर्वी तीन जणांचे बळी गेल्यावर जागी झालेली यंत्रना, पैशाच्या मोहापायी पुन्हा एकदा झोपल्याचे दिसुन येत आहे.
एमआयटी कॉर्नर की अडथळ्याचा थांबा..
लोणीस्टेशनच्या पुढील चौकाला एमआयटी कॉर्नर या नावाने मागील कांही वर्षापासुन ओळखले जाऊ लागले आहे. मात्र हा कॉर्नर अपघाताचे मोठे ठिकाण होऊ लागले आहे. कॉर्नरच्या दोन्ही बाजुला असलेल्या हॉटेलमालकांनी, पार्कींगसाठी जागा सोडली नसल्याने, हा चौक अतीशय धोकादायक बनला आहे. आर्शीवाद ह़ॉटेलच्या बाजुने स्टेशनहुन गावात जातांना, एमआयटी कॉर्नर ची अवस्था अतीशय चिंताजणक वाटावी अशी बनली आहे. रस्त्यावर मोठी वहाने व दुचाकी लागत असल्याने, या ठिकाणी मोठा मोठा अपघात होण्याची मोठी भिती आहे. ही बाब पोलिसांना दिसत असुनही, पोलिस यंत्रना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
वहातुक नियमनाकडे दुर्लक्ष, “पठाणी वसुली” मात्र जोरात..
लोणी काळभोर पोलिसांची वहातुक शाखा वहातुक नियमनाकडे व वहातुक समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असली तरी, त्यांची पठाणी वसुली मात्र जोरात चालु असल्याचे चित्र उरुळी कांचन (तळवाडी चौक), कुंजीरवाडी, थेऊरफाटा, कवडीपाट टोलनाका अशा विविध ठिकाणी दिसुन येत आहे. कवडीपाट टोलनाका तर पोलिसांच्या पठाणी वसुलीचे हक्काचे ठिकाण बनले आहे. कवडीपाट ते उरुळी कांचन दरम्यान कितीही वहातुक कोंडी झालेली असली तरी, पठाणी वसुली मात्र सुरुच असते.