पुणे : ”सिग्नल का तोडला”, अशी विचारणा करणार्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला एका कारचालकाने पायातील बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुणे-नगर रोडवरील खराडी बायपास चौकात शनिवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.
बाळकृष्ण जयराम टाळके (वय ३२, रा. निओ सिटी सोसायटी, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ वाहतूक विभागातील पोलीस अंमलदाराने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी बायपास चौकात शनिवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करीत होते. तेव्हा चंदननगरकडून हडपसरच्या दिशेने जाणार्या वाहतूकीसाठी लाल सिग्नल लागला होता. तेव्हा फिर्यादी यांनी या रोडने जाणार्या वाहनांना थांबण्याचा हाताने इशारा केला.
त्यानंतर आरोपी बाळकृष्ण टाळके यांनी सिग्नल तोडून त्यांची कार घेऊन पुढे आले. तेव्हा फिर्यादी यांनी ”सिग्नल का तोडला”, अशी विचारणा केली. आरोपीला ”सिग्नल का तोडला”, याची विचारणा केल्याचा राग आला. आणि आरोपीने फिर्यादीच्या सरकारी वर्दीची कॉलर पकडून शर्टचे बटण तोडले. त्यांना शिवीगाळ करुन तुम्हा पोलिसांना खूप मस्ती आली आहे. तसेच त्याच्या पायातील बुट हातात घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपी बाळकृष्ण टाळके याचा विरोधात पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तरी, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत.