Tomato News शिरूर (पुणे) : शेतकऱ्याचे तब्बल २० कॅरेट टोमॅटो आजच्या बाजारभावाप्रमाणे तब्बल ४० हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना पिंपरखेड (ता. शिरूर) गावात बुधवारी (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. (Tomato News)
याप्रकरणी शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोमे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली होती. टोमॅटोला चांगला बाजारभाव असल्याने ढोमे यांनी टोमॅटो पिकाची तोडणी केली. त्यानंतर टोमॅटोचे २० कॅरेट आपल्या वाहनातून घराजवळ आणून उभे केले होते.
सांयकाळी अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी व क्रेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले. त्यांनतर ढोमे हे सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले क्रेट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून शेतकऱ्यांशी निगडीत कृषीपंप, ठिबकसंच, केबलचोरी, कृषीयंत्र चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे. यामध्ये बहुतेक चोऱ्यांचा तपास न लागता दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढले असल्याने सदर चोरीतील गुन्हेगारांचा छडा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या टोमॅटो बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकऱ्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. जिल्हयातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या माध्यमातून लाखोंच्या घरात उत्पन्न मिळवले आहे. तर काही कोट्याधीश झाले आहे. बाजारात टोमॅटो महाग झाले असले तरी बळीराजा मात्र सुखावल्याचे चित्र दिसू लागले आहे