सोलापूर : पॅरोलवर बाहेर आलेल्या परंतु पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खुणेश्वर (ता. मोहोळ) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.
वैभव कालिदास मगर (वय- ४१ रा. खुनेश्वर, ता. मोहोळ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची खबर भिकाजी सोपान चव्हाण (वय – ५२ रा खुनेश्वर) यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मगर हा पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्यामुळे तो खुनेश्वर गावी रजेवर आला होता. वैभव याची पहिली पत्नी मृत झाल्यानंतर त्याने तिच्याच बहिणीशी सन २०१९ मध्ये मुंबई येथील एका मंगल कार्यालयात विवाह केला होता. दरम्यान विवाह झाल्यानंतर वैभव याला दोन महिन्यातच पहिल्या पत्नीच्या खुनाबाबत जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
वैभव याला गावी आल्यानंतर एक दिवसाआड तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे हजेरी देण्याकरीता जावे लागत होते. तो तामलवाडी येथे हजेरी देण्यास गेला असता त्याने आई निर्मलाला फोन केला व मी येतो तोपर्यंत जेवण तयार करून ठेव असे सांगितले होते.
रात्री उशिरापर्यंत वैभव न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. वैभवच्या नातेवाईक असलेल्या शैला या शेतातील देवाची देवपूजा करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. त्यावेळी शेतातील चिंचेच्या झाडाला वैभवने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. शैला यांनी ही घटना नातेवाईकांना सांगितली.
दरम्यान, मृत वैभव यांच्या खिशात दोन पानी चिठ्ठी सापडली असून, त्यात माझ्या मृत्यूस माझी पत्नीच जबाबदार असून तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करावा व ही चिठ्ठीच माझी फिर्याद समजावी असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करत आहेत.