पुणे – शौचालय करण्यासाठी खोदलेल्या शोषखड्ड्याने तीन वर्षाच्या चिमूकलीचा बळी घेतला. त्यामुळे तिच्या परिवरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कोरेगाव खुर्द(ता.खेड) येथे ही दुर्घटना घडली.
गाथा नितीन कडूसकर असे अपघातात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती एकुलती एक मुलगी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव खुर्द येथील माळवाडी परिसरात राहणाऱ्या कडूसकर कुटुंबाने घराच्या उत्तरेला सांडपाणी व शौचालय बांधण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. पावसामुळे सध्या बांधकाम बंद आहे.
गाथा हि चिमुकली घराजवळ कागदाशी खेळत होती. थोड्या वेळानंतर गाथा दिसली नाही. तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला, त्यावेळी खड्ड्यात साचलेल्या पाण्यावर एक कागद तरंगताना दिसला. आणि त्या खड्ड्यात गाथा मृतावस्थेत आढळून आली.
दरम्यान, घराच्या परिसरात असे खड्डे असल्यास त्यांना सुरक्षित कुंपण घालावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा. असे आवाहन महाळुंगे पोलिसांनी केले आहे.