लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ऑर्चिड हॉटेलच्या पार्किंगमध्ये फोर्ड कार पार्क करताना वडिलांच्या कारखाली तीन वर्षीय चिमुकला आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
किआंश किरण माने (वय- ३, रा. चिखली, सानेचौक, हवेली, पुणे) असे चिमुरड्या बालकाचे नाव आहे. तर किरण राजकुमार माने (वय-२८, रा- चिखली, सानेचौक, हवेली, पुणे) असे या दुर्घटनेतील वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी दिपक शिवाजी वारंगुळे (वय-२८, रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या हॉटेल ऑर्चिडच्या समोर पार्किंगमध्ये किरण माने हे त्यांच्या जवळील फोर्ड गाडी पार्क करत असताना गाडीपुढे खेळणारा किआंश त्यांना दिसला नाही ,त्यामुळे कियांश च्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.