पिंपरी : भंगार व्यवसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांच्या निंलबनाचे आदेश दिले आहे. पोलिस हवालदार विलास बोऱ्हाडे, पोलिस नाईक अशोक घुगे व पोलिस शिपाई ज्योतिराम झेंडे अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
“पैसे दे नाहीतर तुझ्यावर केस करतो,” अशी धमकी देत एकाकडून पैसे उकळणाऱ्या हिंजवडी पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
हे तीन पोलिस २ ऑक्टोबरला भंगार व्यवसायिक अशरफ चौधरी यांना भेटले. ‘पैसे दे, नाहीतर तुझ्यावर केस करीन’ अशी धमकी देत चौधरी यांच्या खिशातील १७ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पुन्हा ‘पाच लाख दे नाहीतर तुझ्यावर केस करून अटक करू’ अशी त्यांना धमकी दिली.
दरम्यान, अशरफ चौधरी यांनी मित्रांसह इतरांकडून पैसे गोळा करून, त्यांना दीड लाख रुपये दिले. तरीही वारंवार पैशाची मागणी होत असल्याने चौधरी यांनी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणात कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश केले.