सुरेश घाडगे
परंडा : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विद्युत पंप व शेळ्या चोरी करणाऱ्या तीन आरोपींना परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महावीर संजय पवार, ज्योतीराम भास्कर पाटील व बिभिषण हंबीरराव मोरे (सर्व रा. देवगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ हजार रुपयांच्या दोन विद्युत मोटर जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगिरी (ता. परंडा) ग्रामपंचायत हद्दीतून जनावराच्या गोठ्यामध्ये ठेवलेली ६ हजार ५०० रुपये किमतीचा विद्युत पंप व गावातील इतरही लोकांच्या विद्युत मोटारी व शेळ्या चोरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची तक्रार शेतकरी श्रीराम रमेश पाटील यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेचा परंडा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ हजार रुपयांच्या दोन विद्युत मोटर जप्त केल्या आहेत.
सदरची कामगिरी परंडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस नाईक विशाल खोसे, प्रशांत शंदारकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाघमारे, आप्पा माने, गलांडे, लोहार यांच्या पथकाने केली आहे.