पुणे : पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका तरुणाची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले आहे.
संदीप मारुती पांडव (वय ३०, रा. ऐरोली, नवी मुंबई), जगन्नाथन बाळकृष्ण (वय ३७, रा. सेंट्रल रेल्वे कॉलनी, जुई नगर, ठाणे), नितीन महादू वाघ (वय २८, रा. नवी मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश तानाजी जगताप (रा. पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला पनवेल महापालिकेत भरारी पथकात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी डिपॉझिट म्हणून फिर्यादीकडून पाच लाख व इतर फी म्हणून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या नावे पनवेल महापालिकेचे बनावट आयडी कार्ड बनवून दिले. नंतर फिर्यादीला कोणतीही नोकरी न लावता दिलेल्या पैशांपैकी केवळ दीड लाख रुपये फिर्यादीला परत दिले. मात्र, उरलेले पैसे परत न देता फिर्यादीची चार लाख रुपयांची फसवणूक केली. I
दरम्यान, हा प्रकार ३ डिसेंबर २०२१ पासून अद्यापपर्यंत घडला. अशी तक्रार जगताप यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.