पुणे : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर कोयते नाचवत नाचणाऱ्या तडीपार गुंडांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) अटक केली. अमर अनंत काथवटे (वय २६), हृषीकेश ऊर्फ ऋषी राजू शिंदे (वय २६, दोघेही रा. अरण्येश्वर) आणि अभिजित श्रावण चंदनशिवे (वय २६, रा. बिबवेवाडी) ही आरोपींची नावे आहेत. गणेश अनंत काथवटे (वय २५) व अमित बाबू ढावरे (वय २२) हे त्यांचे साथीदार पसार झालेत. आरोपी काथवटे, शिंदे, चंदनशिवे यांच्याकडून कोयता, बांबू, मोबाइल फोन, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काथवटे, शिंदे, चंदनशिवे, ढावरे सराईत गुंड आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. त्यातून त्यांची जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर त्यांना तडीपार करण्यात आले होते. त्या आदेशाचा भंग करून ते शहरात वावरत होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाल्यानंतर सहकारनगर परिसरात एका माजी नगरसेवकाने सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर कार्यक्रमाचे संयोजन केले होते. तेथे ध्वनिवर्धक लावून काथवटे, शिदि, चंदनशिवे, ढावरे शस्त्रे नाचवत नृत्य करीत होते. त्याबाबत सोशल मीडियावर क्लिप व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी शोध जारी केला. पसार झालेले आरोपी तळजाई टेकडी परिसरातील फिरायला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदा हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तळजाई मंदिराजवळील टेकडीवर पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्यासाठी एकत्र आल्याची कबुली त्यांनी दिली.