पुणे : मित्रमैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षाच्या तरुणीला लग्नाची मागणी घालून “तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही” असे बोलून तोंडावर अॅसीड फेकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना पाषाण येथील शिवनगरमधील राऊंड द क्लॉक कॅफेमध्ये सोमवारी (ता.५) सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे.
याप्रकरणी तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल नवगीरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा फिर्यादी तरुणीचा ओळखीचा आहे. तरुणी हॉटेलमध्ये मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी अमोल हा मित्रांसह तेथे आला.
त्याने फिर्यादीचा हात धरुन हॉटेलच्या बाहेर चल तुझ्याशी बोलायचे असून तिला बाहेर ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी तरुणीने हात झटकून बाहेर आली.
दरम्यान, बाहेर आल्यावर अमोलने तरुणीला माझ्याशी लग्न कऱ तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही तसेच तोंडावर अॅसीड फेकेल, अशी धमकी दिली. या घटनेने घाबरुन तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आरोपी अमोलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.