पुणे : महिलेचा विनयभंग करुन पतीला दिली जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार देहूरोडमधून समोर आला आहे. कब्रस्तानचे गेट उघडे ठेवले म्हणून दोघांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान यावेळी दोघांना समजूत काढण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला व पतीली जीवे मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार ईदगाह मस्जिद कब्रस्तान येथे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला.
देहूरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीसांनी अजीज शेख (रा. देहूरोड बाजार), जलील शेख (रा. जामा मस्जिद, देहुरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कब्रस्तानमध्ये सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना जाता यावे यासाठी कब्रस्तानचे गेट उघडे ठेवले होते. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घातला. तसेच फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी या पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील धक्काबुक्की करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. तसेच फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.