पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. होईल तेवढ्या लवकर काम सोड नायतर सुरा तुझ्या गालावर फिरवतो’ अशी धमकी देखील मुलीला दिली. या प्रकरणी अज्ञात मोबाइल धारकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 29 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ आणि 11 मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवर पीडित मुलीच्या घरात घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या 38 वर्षीय आईने 12 मार्च रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी मोबाइल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. यामध्ये अश्लील बोलून मुलीला काम सोडण्यास सांगितले. तसेच काम सोडले नाहीतर चाकूने वार करण्याची धमकी देखील दिली. यानंतर फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीला रिप्लाय केला असता, त्याने पुन्हा अश्लील मेसेज करुन धमकी देऊन मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.