पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती करून खुनाची धमकी दिल्याची घटना घडली आहे. एका तीसवर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिला मूल झाले. त्यानंतर तिला पुन्हा गर्भवती करून दुसऱ्या तरुणीशी लग्नाचा घाट घालणाऱ्या तरुणाविराेधात लाेणीकंद पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून ऋषिकेश एकनाथ कुबेर (वय २५, रा. वाघोली) या तरुणास लाेणीकंद पाेलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख होती. आरोपीने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून त्यांना दीड वर्षापूर्वी मुलगी झाली. त्यानंतरही तरुणाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याने पुन्हा ती महिला गर्भवती राहिली.
दरम्यान, ऋषिकेश याने संबंधित महिलेला साेडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा घाट घातला. त्याला विराेध दर्शवताच महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून लग्नाला विराेध केल्याने, तुला आणि तुझ्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ॲट्राॅसिटीखाली गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील तपास करीत आहेत.