पुणे : माहेरहून सासरी बसमधून जात असताना महिलेच्या ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता.२७) उघडकीस आली आहे.
याप्रकरणी कांता विलास शिनलकर (वय-५६ रा. बदलापूर ठाणे यांनी) शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता शिनलकर यांचे माहेर शिक्रापूर असून त्या सध्या ठाणे येथे राहत आहेत. लोणी धामणी (ता.आंबेगाव) गावच्या यात्रेसाठी शिनलकर शिक्रापूर येथे माहेरी आल्या होत्या. शिक्रापूर येथे माहेरी थांबून शुक्रवारी (ता.२७) पुन्हा शिक्रापूर-पुणे बसने माघारी चालल्या होत्या. यावेळी शिनलकर यांनी त्यांचे सव्वा ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवी मध्ये ठेवले होते.
दरम्यान, कांता शिनलकर या पुणे येथे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे करीत आहे.