पुणे : आंबेगाव येथील काळुबाई मंदिरात आज गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम मशीन असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
रोडेवाडी (नाथनगर) येथे सविंदणे पोंदवाडी शिवेवर काळुबाई मंदिर आहे. आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मंदिराचे पुजारी किसन नरवडे व गायकवाड बाबा पूजा करायला गेले असता, दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडलेला आढळला. किसन नरवडे यांनी नितिन नरवडे यांना फोन करुन झालेल्या प्रकारची माहीती दिली.
खरेदी विक्री संघांचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, बाळासाहेब कोरके, सुनिल नरवडे, अमोल वाळुंज, सोमनाथ वाळुंज, आबा नरवडे यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. लोखंडी खुटीने दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम मशीन, असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
लोखंडी खुटी जागेवर सापडली आहे. पारगाव कारखाना पोलिस स्टेशनला घटनेची माहीती दिल्याचे संदीप पोखरकर यांनी सांगितले. मागील तीन आठवड्यापासुन तालुक्याच्या पुर्व भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन च्या घिरट्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असुन अलीकडच्या काही दिवसात ड्रोन ज्या परिसरात फिरले, त्या परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. काळूबाई मंदिर परिसरातही मागील दोन आठवड्यापुर्वी ड्रोनने घिरट्या घातल्या होत्या.