उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडे सात लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने भरदिवसा चोरी करून नेल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दातार कॉलनी येथे बुधवारी (ता. ०८) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
सचिन लक्ष्मण कुंभार (वय- ३०) असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुंभार हे पुण्यातील एका कंपनीत कामाला आहेत. तर त्याची आई या गृहिणी आहेत. मंगळवारी आज महिला दिन असल्याने कुंभार यांची आई उरुळी कांचन येथील एका कार्यक्रमाला घराला कुलूप लावून गेल्या होत्या.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सचिन यांचे बंधू उमेश कुंभार हे जेवण करण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य हे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले.
दरम्यान, सदर माहिती आईला दिली. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले तब्बल साडे सात लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार कुलकर्णी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील CCTV बंद..!
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने CCTV च्या वायरी ओढून ठेवल्या आहेत. तसेच जर cctv सुरु असते तर आज झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना हातभार लागला असता अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.
उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोऱ्यात वाढ..!
मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली होती. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही उरुळी कांचन परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.