पुणे : पुण्यात भरदिवसा ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने हातचलाखी करत एका ज्वेलरला तब्बल ५ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या चोरट्याचा सगळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता खडक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठ परिसरात असणाऱ्या एका ज्वेलर्सच्या दुकानात दुपारच्या सुमारास एक इसम ग्राहक बनून आला. या इसमाने आधी त्या दुकानात १ ग्रॅम सोने खरेदी केले. त्यानंतर त्याने दुकानदाराला आणखी काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने त्याला जवळपास ६९ ग्रॅम दागिने दाखवले.
हा इसम दागिने बघता बघता बाहेर गेला. छोटे छोटे दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना ते छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात ठेवले आणि दागिने बघत बघत हळूच त्याने ते दागिने खिशात ठेवले.
दरम्यान, काही वेळात हा चोरटा फोनवर बोलण्याचे नाटक करत दुकानदारासमोर बसून राहिला आणि ५ मिनिटात फोनवर बोलत असल्याचे भासवत दुकानातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी हा इसम दुकानात परत आला नाही. त्यानंतर दुकानदाराला चोरी झाल्याचं लक्षात आलं. दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.