पुणे : चार जणांच्या टोळक्याने तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडात मिर्ची पूड कोंबली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तिच्या गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने वार करीत अंगावरील कपडे फाडल्याची धक्कादायक घटना निगडी परिसरात घडली आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पांढरकर सभागृहाच्या मागे हा प्रकार घडला आहे. दिवसा घडलेल्या या प्रकाराने निगडीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन मारुती घाडगे (वय-३१ रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव, पुणे) याच्यासह इतर तीन अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पीडित तरुणी गुरुदेवनगर येथून दर्शन करून येत होती. रस्त्यावर कणीस घेत असताना आरोपी घाडगे याच्या सांगण्यावरून तीन आरोपी तेथे आले. त्यापैकी एकाने ‘काढ रे काढ कोयता काढ हिच्यावर वार कर ‘ असे म्हटल्याने तरुणी भीतीने पळत सुटली. पांढरकर सभागृहाच्या माग गुरुदेवनगर येथील एका सार्वजनिक शौचालयात जाऊन लपली.
दरम्यान, त्यांनी तरुणीच्या अंगावर, गुप्तांगावर दारू ओतून मिर्ची पावडर खाऊ घातली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पिडीत तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करुन तिेचे सर्व कपडे फाडले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासेकरीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेने निगडीसह परिसर हादरला आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.