हनुमंत चिकणे
लोणी काळभोर : थेऊर येथे चार दिवसापूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या प्रियकरानेच चारित्र्याचा संशयावरून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपीला लोणी काळभोर पोलसांनी अटक केली आहे. वैशाली लाडप्पा दुधवाले, रा. भिमा कोरेगाव, ता. शिरुर, मुळगाव रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद असे खून झालेल्या महिलेचे नाव असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिच्याच प्रियकराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
महेश पंडित चौगुले (वय-२४, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळ गाव रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी अनोळखी महिलेचा तिच्या डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तसेच तिची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकाला योग्य त्या सुचना देऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला असता सदर महिलेचा प्रियकर महेश चौगुले याला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी करीत असताना सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदर महिलेचे नाव सांगितले. तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. तसेच चारित्र्याच्या संशयावरून तिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली महेश चौगुले याने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, चिंतामणी हायस्कुल समोरील मैदाना शेजारी, तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेतून संध्याकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कोणी फोन केले आहेत. यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात पोलिसांना सदर ठिकाणावरून एक फोन साडे आकरा वाजण्याच्या सुमारास फोनवरून संभाषण झाले. व नंतर पुढील दोन दिवस फोन हा बंद असल्याने संशय बळावला. त्यानुसार हा फोन मृत महिलेचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. व त्या मोबाईल वरून मृत महिलेच्या मोबाईलवरती कोणी फोन केले यावरून सदर आरोपीला तळेगाव दाभाडे परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे,श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.