पुणे : काँग्रेसला पुन्हा भरभराटीचे दिवस यावेत यासाठी पुण्याच्या काँग्रेसभवनमध्ये होम हवन करण्यात आले होते, आता मात्र या प्रकारची दखल थेट हाय कमांडने घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहेत.
दिल्ली येथे काँग्रेसची बैठक घेण्यात आली, यात काँग्रेसची आगामी दिशा कशी असावी यावर चारचा झाली. या बैठकीला राज्याचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रश्नावर चर्चा करताना काँग्रेसभवन मध्ये झालेल्या होम हवनाचा उल्लेख करण्यात आला.
पक्षाला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आल्याचे एका नेत्याने निदर्शनास आणून देताना याबाबत लेखी तक्रार देखील केल्याचे नमूद केले. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निरीक्षण नेमून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरीने हा प्रकार करणाऱ्यावर योग्य टी कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये ११ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान गोपनीय पद्धतीने पहिल्या मजल्यावर होम हवन करण्यात आले होते. पक्षाला भरभराट यावी, या साठी हे होमहवन केले असे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुण्यात काँग्रेस भवनची स्थापना झाल्यापासून ८२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात होमहवन झाले होते. त्यामुळे पक्ष वर्तुळात याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.