उरुळी कांचन : अष्टापूर (ता. हवेली) येथील पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सव्वा दोन कोटींच्या मशीनरींची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावून तब्बल २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकावर लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार २० जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे.
तत्कालीन व्यवस्थापक अनिलकुमार सिंग (रा. गोकुळ विहार कॉम्प्लेक्स, मुंबई) आणि संचालक शिवशक्ती असोसिएट (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक ग्यानेंद्रकुमार शिवकुमार सिंग (रा. मुंबई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोणी कंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्यानेंद्रकुमार सिंग हे मुंबई येथील युनियन बँक ऑफ इंडिया ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांचमध्ये सहायक व्यवस्थापक आहेत. अतुल दुधे यांच्या मालकीची अष्टापूर येथे पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी आहे. या कंपनीत लोखंडी पाईप बनविण्याचा कारखाना आहे. अतुल दुधे यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते.
त्यानंतर अतुल दुधे यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने त्यांची तारण मालमत्ता असलेली पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी सील केली . तत्कालीन व्यवस्थापक अनिलकुमार सिंग यांनी मुंबई येथील शिवशक्ती सुरक्षा असोशिएट या खासगी सुरक्षा एजन्सीकडे लायसन्स नसताना कर्ज तारण मालमत्ता ताब्यात दिली. तसेच त्या ठिकाणी कायमस्वरुप तीन सुरक्षा रक्षक नेमणूक केल्याचे दाखवून दिले. आणि त्यांचा पगार बँकेमार्फत दिला.
दरम्यान, सहायक व्यवस्थापक ग्यानेंद्रकुमार सिंग यांनी कंपनीला भेट दिली. तेव्हा तेथे साध्या वेशातील सुरक्षा रक्षक आढळून आले. त्यांनी चौकशी केल्यावर अशी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सी नसल्याचे आढळून आले.
सिंग यांनी कंपनीत जाऊन पाहणी केली असता, कंपनीतील मशीनरी चोरीला गेली आढळून आले. त्यामुळे कंपनीतील २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची मालमत्तेचा अपहार झाली आहे. आणि याला बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अनिलकुमार सिंग कारणीभूत असल्याप्रकरणी ग्यानेंद्रकुमार सिंग यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरी, पुढील तपास लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.