पाबळ / योगेश पडवळ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरु असतानाच चोरट्यांनी मलठणच्या शिंदे मळ्यात असलेल्या श्री दत्त मंदिराची दोन कुलपे तोडून मंदिरातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा ऍम्प्लिफायर व एक पितळाची समई असे 11 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले.
मलठण (ता. शिरूर) लाखेवाडी दरम्यान असलेल्या शिंदे मळ्यात लोकवर्गणीतून सुंदर असे दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. शनिवार (ता. १६) ला पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे मुख्य व गाभान्यास असलेल्या ग्रिलची कुलपे तोडून मंदिरातील ऍम्प्लिफायर व एक पितळेची समई असा ऐवज चोरून नेला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. मंदिराचे पुजारी एकनाथ निवृत्ती शिंदे यांनी टाकळी पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिल्याची माहिती पोलीस निलेश शिंदे यांनी दिली.
या परिसरात दोनच घरे आहेत. चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन चोरी केली असण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी शिरूर पोलिसांना दिली. त्यानंतर टाकळी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी मलठणचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, विलास गोसावी, मोहन शिंदे, पांडुरंग शिंदे, संतोष कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे, कोणी संशयास्पद व्यक्ती वाटल्यास शिरूर पोलिसांना कळविण्याचे आवाहन शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.