पुणे : हडपसर परिसरात सात जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्लाकरत त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या तोंडावर दगड घालून त्याचे सात दात पाडले गेले असून, त्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. मांजरी बुद्रुक परिसरात ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे.
या हल्ल्यात विक्रांत साळुंखे (रा. मांजरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात संतोष भंडारी याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी विक्रांत याचा मित्र संग्राम हरपळे (वय २२) यांनी हडपसर पोलीसात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत व संग्राम हे आईस्क्रीम खाण्यासाठी एका गाड्यावर गेले होते. त्यावेळी टोळकेही त्याठिकाणी होते. त्यांच्यात गाडी पार्क करण्यावरून वादावादी झाली. त्यानंतर या टोळक्याने लोखंडी रॉड तसेच बांबू व हाताने दोघांना बेदम मारहाण केली तर एकाने विक्रांत याच्या तोंडावर दगड मारला. यात विक्रांत याचे सहा ते सात दात पडले गेले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.