पुणे – तुमच्या घरातील लॉकर खराब झाले असेल आणि तुम्ही कोणाला दुरुस्त करण्यासाठी बोलावले असेल तर तो व्यक्ती चोर देखील असू शकतो. कारण अशीच एक घटना पुणे येथील ताडीवाला येथून समोर आली आहे. लॉकर दुरुस्त करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने कपाटातले सोने आणि काही रोकडही लंपास केले. आरोपी हे मुद्देमाल विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
प्रधानसिंग उर्फ पठाण बख्तारसिंग शिकलीकर (वय. ४१, रा. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . त्यांच्याकडून १५ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख ९० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी ( ता. ३० ) रोजी ताडीवाला रस्ता परिसरात लॉकर दुरुस्ती करण्यासाठी दोघेजण ताडीवाला रस्त्यावर फिरत होते. लॉकर दुरुस्तीचे सामान आणि अवजारे घेऊन हुबेहुब लॉकर दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचा सारखा त्यांचा वेष होता. आपला लॉकर खराब झाला होता म्हणून दोघांना लॉकर दुरुस्ती करण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार चोरट्यांनी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला.
लॉकर दुरुस्तीसाठी नट लागणार असल्याचे सांगून दोघांनी नट आणण्यासाठी महिलेला घराबाहेर दूकानामध्ये पाठविले. तर घरातील मुलाल तेल घेऊन येण्यास सांगितले. ही संधी साधून एका बनावट चावीने कपाटाचे लॉकर खोलून सोन्याच्या बांगड्या, चैन, मंगळसूत्र, झूमके असे तब्बल १५ तोळ्यांचे दागिने आणि १ लाख ९० हजारांची रोकड घेऊन दोघेही पसार झाले.
या घटनेबद्दल महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळतातच बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.