पुणे : आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींची सिंहगड पोलिसांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईलने धुलाई केली. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली.
करण दळवी (रा. वडगाव) व एक अल्पवयीन असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरवातीला रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीवर कोयत्याने वार केले. यानंतर येथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. तेथून पुढे रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केला. यानंतर आणखी एकाच्या पाठीवर प्लॅस्टीकचा स्टुल फेकून मारला.
दरम्यान, दोघांनी मिळून परिसरात तब्बल २० मिनिटे धुडगूस घातला होता. सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत गस्त घालत होते.
याबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते. पोलिसांना पाहताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.